Monday, August 23, 2021

कविता: मित्र, चहा आणि पाऊस




ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'जागतिक मैत्री दिवस' साजरा केला जातो. त्यानंतर १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. या वर्षी तर 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा होणार आहे. आणि याच महिन्यात श्रावण-धारा घेऊन पाऊस येतो. या सगळ्यांना एकत्र जोडणारी ही कविता.

मित्र, चहा आणि पाऊस

मित्र, चहा आणि पाऊस असल्यावर,
अगदी धर्मनिरपेक्ष असल्यासारखं वाटत.
कारण, मैत्रीला जात नसते,
चहाला धर्म नसतो आणि पावसाला रंग.
मित्र, चहा आणि पाऊस असल्यावर,
सार्वभौम असल्याची भावना जागृत होते.
कारण मैत्री बेपर्वा असते,
चहा अधीर असतो आणि पाऊस मुक्त.
मित्र, चहा आणि पाऊस असल्यावर,
मन समाजवादी होऊ पाहतं.
कारण मैत्री गरीब-श्रीमंत बघत नाही,
चहा चवीत बदलत नाही आणि पाऊस माणसात.
लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या या नात्याला,
निस्वार्थीपणाची झालर आहे.
सगळी मोह माया फिकी पडते,
कारण मित्र, चहा आणि पाऊस असल्यावर काय कमी आहे.

--
प्रा. डॉ. रवींद्र मुंजे

1 comment: